किराणा माल, चिकन, मटणची दुकाने सुरू राहणार… 15 जुलै रात्री 12 वाजल्यापासून ते 26 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश जारी
[avatar]
किराणा माल, चिकन, मटणची दुकाने सुरू राहणार…
15 जुलै रात्री 12 वाजल्यापासून ते 26 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश जारी
अलिबाग : 15 जुलै रात्री 12 वाजल्यापासून 24 तारखेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली. प्रत्यक्षात रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी निधी चौधरी यांनी 14 जुलै रोजी रात्री उशिरा परिपत्रक जारी केले आहेत. त्यानुसार हा लॉकडाऊन 15 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 26 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आला आहे. या काळात किराणा सामान, चिकन, मटण सुरू राहणार आहे. याशिवाय काय सुरू आणि काय बंद राहणार ? याची माहिती येथे देत आहोत.
या आदेशामध्ये जिल्ह्यात काय सुरु राहील आणि कोणत्या गोष्टींना मनाई करण्यात आली आहेत, याबाबतच सविस्तर माहिती आदेशामध्ये देण्यात आली आहे. यापैकी लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात काय बंद राहणार? याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे असून, या बाबींना संपूर्णतः बंदी राहणार आहे. काय आहेत त्या बाबी जाणून घेऊयात…
लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात खालील बाबी संपूर्णतः बंद राहतील ः
1. खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, करमणूक, स्पर्धा, धार्मिक व अन्य सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सण, उत्सव, उरुस, जत्रा, आठवडा बाजार, मनोरंजनाचे कार्यक्रम, कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, देशांतर्गत व परदेशी सहली इ. यांचे आयोजन करण्यास मनाई राहील.
2. दुकाने/सेवा आस्थापना, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, आठवडा बाजार, उपहार गृहे, खानावळी, चहा टपरी, पान टपरी, स्ट्रीट फूड विक्री करणार्या गाड्या संपूर्णतः बंद राहतील.
3. गॅरेजेस, वर्कशॉप संपूर्णतः बंद राहतील.
4. जलतरण तलाव, उद्याने, मोकळ्या जागा, क्रीडा मैदाने, पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे, बगीचे, सिनेमागृह, नाट्यगृह, रिसॉर्ट, व्यायामशाळा, संग्रहालये, ग्रंथालये, सेतू केंद्रे, आधार केंद्रे, व्हिडीओ पार्लर, ऑनलाईन लॉटरी सेंटर, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, सोशल क्लब, मनोरंजनाची ठिकाणी, क्लब/पब इ. संपूर्णतः बंद राहतील.
5. परमिट रुम, बिअर बार, वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारुची दुकाने बंद राहतील. तथापि, सदर आस्थापनांमधून घरपोच सेवा सुरु राहतील.
6. ब्युटी पार्लर, सलून, स्पा संपूर्णतः बंद राहतील.
7. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक/प्रशिक्षण संस्था व खाजगी शिकवणी वर्ग बंद राहतील. तथापी ‘ऑनलाईन क्लासेस/डिस्टन्स लर्निंग’ सुरु राहील.
8. सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी बंद राहतील. सदर प्रार्थनास्थळांमध्ये परंपरेनुसार केली जाणारी नियमित पूजा अर्चा, धार्मिक विधी तीन किंवा त्यापेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यास मान्यता राहील.
9. कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली सर्व प्रकारची तीनचाकी वाहने, हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने, रिक्षा, टॅक्सी, दुचाकी वाहने यांच्या वापरावर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. अवजड वाहने, वस्तू वाहक वाहने (गुड्स कॅरीअर) अबाधितपणे सुरु राहतील. (अत्यावश्यक सेवेकरिता लागणारी वाहने वगळून सदर प्रकारची वाहने अत्यावश्यक कारणासाठी रस्त्यावर आल्यास उदा. वैद्यकीय कारण, तर त्याबाबतचे सबळ पुरावे संबंधितांनी सोबत ठेवणे आवश्यक असेल.)
10. सर्व क्रीडांगणाचा/मैदानाचा वापर वैयक्तिक व्यायामासाठी/सरावासाठी करता येणार नाही. तसेच नागरिकांना मॉर्निंग वॉक, ईव्हिनिंग वॉक, सायकलिंगसाठी बाहेर पडण्यास मनाई असेल.
11. नागरी तसेच ग्रामीण भागात सर्व प्रकारच्या कंपन्या, कारखाने व उद्योग बंद राहतील. तथापी, ज्या आस्थापना (उदा. माहिती व तंत्रज्ञान उद्योग, मेजर पोर्ट, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट करणारे उद्योग, पेट्रोकेमिकल, फर्टीलायझर उद्योग इ.) ज्यांच्याकडे देश व परदेशातील अतिमहत्वाच्या (क्रिटीकल नॅशनल अॅण्ड इंटरनॅशनल इन्फास्ट्रक्चर) उपक्रमांची जबाबदारी आहे व सदर आस्थापना बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रियेला बाधा येऊ शकते, ज्या कंपन्यांची उत्पादन प्रक्रिया अखंडीत चालू राहणे (कंटीन्युअस प्रोसेसिंग इंडस्ट्री) अनिवार्य आहे, अशा सर्व कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्शन कंपनी, खाद्य, मेडिकल उपकरण, औषधे, बियाणे, खते इ. चे उद्योग टप्प्याटप्प्याने कमीत कमी आस्थापनांसह (कमाल 25 टक्के) कार्यान्वित राहतील. सदर कंपन्यांनी कार्यरत कर्मचार्यांचे आटी-सीपीआर टेस्ट करणे आवश्यक राहील. सदरहू प्रमाणे केलेल्या तपासणी व त्यांच्या निकालाची माहिती संबंधित तालुका अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील. सदर आस्थापनांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात (वर्क फ्रॉम होम) संकल्पनेस प्रोत्साहन देण्यात यावे.
12. नागरी भागात तसेच ग्रामीण भागात सर्व प्रकारचे बांधकामे बंद राहतील.
13. सर्व प्रकारची मंगल कार्यालये, हॉल इ. तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ इ. बंद राहतील. तथापी, आवश्यक शारीरिक अंत ठेवून पूर्वनियोजित, परवानगी घेतलेले विवाह समारंभ 20 व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडता येतील.
14. खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.
15. सर्व सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी मास्क/फेस कव्हर परिधान करणे बंधनकारक असेल, अन्यथा सदर व्यक्ती रक्कम रु. 500 इतक्या दंडनीय कारवाईस पात्र राहील.
16. महामार्गावरील ट्रक दुरुस्ती करणारे गॅरेजेस/टायर दुकाने/ढाबा/हॉटेल 10 टक्के कामगारांच्या उपस्थितीत सुरु राहील. तथापी, सदर कामगार कोव्हीड-19 विषाणूच्या संसर्गामुळे प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रामधून (कंटेन्मेंट झोन) अथवा भविष्यात प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्यास अशा क्षेत्रातून आलेले नसावेत. कामगारांनी मास्क/फेस कव्हर परिधान करणे तसेच शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक असेल. कामगारांची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना सॅनिटायझर, हँडवॉश, मास्क/फेस कव्हर, हँड ग्लोव्हज पुरविण्याची जबाबदारी मालकांची असेल.
17. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास संबंधित व्यक्ती 500 रुपये इतक्या दंडनीय कारवाईस पात्र राहील.
18. कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखूजन्य पदार्थ इत्यादीचे सेवन करणार नाही.
19. अनावश्यक गर्दी न होऊ देता, आवश्यक शारीरिक अंतर ठेवून कमाल 20 व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडता येतील.
लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात खालील गोष्टी मर्यादीत स्वरुपात सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे ः-
1. शासकीय/निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना इत्यादी सुरु राहतील. संबंधितांनी घरी परतल्यावर मानक कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) अनुसरावी व ज्येष्ठ नागरिकांपासून दूर रहावे.
2. सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका नियमानुसार संपूर्ण मनुष्यबळावर सुरु राहतील. बँकेच्या इतर ग्राहक सेवा जसे ऑनलाईन, एटीएम सेवा अखंडीतपणे सुरु राहतील.
3. सर्व मेडीकल दुकाने तसेच ऑनलाईन औषध वितरण सेवा संपूर्ण कालावधीकरिता सुरु राहतील. घरपोच सेवेस प्राधान्य देण्यात यावे.
4. रायगड पोलीस अधीक्षक यांचे कार्यक्षेत्रात आवश्यक व अनावश्यक अशा सर्व प्रकारच्या ई-कॉमर्स सेवा उदा. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट व सर्व कुरिअर्स सेवा व पोस्टल सेवा सुरु राहतील.
5. किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे इ. घरपोच सेवा सकाळी 8 ते रात्री 10 वाजेदरम्यान पुरविण्यास परवानगी राहील. याकरिता आवश्यक पासेस संबंधित तहसीलदार यांचेकडून करुन घ्यावे. तसेच इतर घरपोच सेवा चालू राहतील. त्यासाठीदेखील तहसील कार्यालयाकडून पासेस घ्यावेत.
6. दूध विक्री व दुधाचे घरपोच वितरण करण्यास सकाळी 8 ते रात्री 10 वाजेदरम्यान परवानगी राहील. याकरिता आवश्यक पासेस संबंधित तहसीलदार यांचेकडून करुन घ्यावे.
7. सर्व घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे वितरण सुरु राहील. सर्व डिझेल, पेट्रोल व सीएनजी पंप सुरु राहतील. तथापि, ते केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनास इंधन पुरवठा करतील.
8. सर्व शेतीची कामे, कृषीविषयक व कृषी पूरक बाबी तसेच त्यांची वाहतूक सुरु राहील. कृषी पूरक उत्पादने, खते व बियाणे त्यांचे किरकोळ तसेच घाऊक विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील व घरपोच सेवा देता येईल.
9. जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसा नझाले असून, घरे, इमारती, गोठे इत्यादीच्या पुर्नबांधणीचे / दुरुस्तीचे काम सद्यस्थितीत सुरु आहे. त्याकरिता नागरिकांना लागणारे साहित्य पुरविण्यासाठी व दुरुस्तीची कामे करण्यासाठी घरपोच सेवा देता येईल. त्याकरिता आवश्यक पासेस संबंधित तहसीलदार यांचेकडून करुन घ्यावे.
10. पोलीस, शासकीय कार्यालये, आरोग्य सेवक, पर्यटकांसह अन्य अडकलेल्या व्यक्ती, अलगीकरण कक्ष (क्वारंटाईन फॅसिलिटी) इत्यादी करिता पुरविल्या जाणार्या सेवांकरिता हॉटेल, उपहार गृहे, खानावळी यांचे स्वयंपाक गृह सुरु राहतील व त्याद्वारे त्यांना केवळ पार्सल सेवा किंवा घरपोच सेवा पुरविता येतील व हॉटेल हे फक्त तेथे निवासी असलेल्या ग्राहकांना अन्नसेवा सेऊ शकतील.
11. प्रसारमाध्यमांची (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टिव्ही न्यूज चॅनल इ.) कार्यालये, त्यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंट मीडिया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरु राहतील व त्यांची वाहने यांची वाहतूक सुरु राहील. दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके यांचे वितरण सकाळी 6 ते 10 या वेळेमध्येच अनुज्ञेय राहील.
12. पाणी पुरवठा करणार्या खाजगी व सरकारी संस्था, साफसफाई करणार्या संस्था, त्यांच्या गाड्या व जनजागृती करणार्या गाड्या, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविणार्या संस्था, विद्युत पुरवठा करणार्या संस्था व उर्जा विभाग, बँकींग सेवा, आयटी सेवा व जीनावश्यक पुरवठ्याशी निगडीत आहेत, अशा सेवा संपूर्ण क्षमतेसह सुरु राहतील.
13. औद्योगिक व इतर वस्तूंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, आंतर जिल्हा, आंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार अबाधित सुरु राहील. त्याकरिता सर्व अवजड वाहने ही विना परवानगी सुरु राहतील.
14. राज्य शासकीय / केंद्र शासकीय / शासन अंगिकृत उपक्रमांचे अधिकारी व कर्मचारी, डॉक्टर, नर्स, वैद्यकीय व्यावसायिक, परिचारीका, पॅरामेडीकल कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटींग व डिजिटल मीडियाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबंधीत मेडीकल शॉपचे कर्मचारी, दूध विक्रेते, अत्यावश्यक सेवा जसे कृषी बी बियाणे, खते, गॅस वितरक, पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता करणारे शासकीय व खाजगी कामगार, अग्निशमन सेवा, जलःनिस्सारण तसेच पावसाळ्यादरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे करणारे, वीज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक इत्यादींना चारचाकी, दुचाकी (स्वतःकरिता फक्त) वाहन वापरण्यास परवानगी राहील. या सर्व कर्मचारी/अधिकारी यांनी स्वतःचे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्वतःचे आधारकार्ड सोबत ठेवावे. वाहनाचे आवश्यक परवाने सोबत ठेवावे. या सर्वांना वाहन फक्त शासकीय कामासाठी अथवा त्यांचे कामाचे जबाबदारीनुसार व शासकीय अथवा त्यांच्या संस्थेने दिलेल्या वेळेतच वापरता येईल.
या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता संबंधित तहसीलदार हे इन्सिडंट कमांडर राहतील.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.वि. कलम 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतुदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.