जिल्हा परिषदेच्या शाळा १५ जून पासून सुरू होणार १लाख८४  हजार  विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप…… 

[avatar]

जिल्हा परिषदेच्या शाळा १५ जून पासून सुरू होणार १लाख८४  हजार  विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप……

अलिबाग(रत्नाकर पाटील)१५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असून, शिक्षण विभागाची जय्यत तयारी सुरु आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून,  एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील असे नियोजन करण्यात येत आहे. सरकारच्या बालभारती विभागाकडे शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी केली होती. सरकारकडून पुस्तके प्राप्त झाली असून, ही पुस्तके तालुक्याच्या गटशिक्षण अधिकार्‍यांमार्फत केंद्रप्रमुख व केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांकडे सूपूर्द करण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ८४ हजार १६२ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही या दृष्टीने शिक्षण विभागामार्फत पाऊले उचलण्यात येत आहेत. १५ जून रोजी शळा सुरु होणार आहेत. त्यापूर्वी ६ ते १४ वयोगटातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये, यासाठी प्रवेश पात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रवेश पात्र बालकाची यादी लाऊडस्पीकरवर घोषित करून शैक्षणिक पदयात्रा व शिक्षकांच्या गृहभेटी व सरपंच, गावकरी, व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचतगट, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वाच्या गृहभेटींचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी स्वागत करण्यासाठी शाळांना तोरणे लावण्यात येणार आहेत. रांगोळ्या काढण्यात येतील. विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांमार्फत स्वागत करण्यात येणार आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत करण्यात येईल. गावात, वार्डात प्रभातफेरी काढण्यात येईल. या प्रभातफेरीत युवक, गावकरी, जेष्ठ नागरिकांना प्रभातफेरीमध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात येणार आहे.
   तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हस्तरीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. वर्षभर १०० टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती देणे तसेच एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही अशी उपस्थितांसह प्रतिज्ञा घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

शाळेचे रुपडे बदलतेय….. 

जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूप पूर्णपणे बदलून गेले आहे. डिजिटल क्लासरूम्स, कृतीयुक्त अध्ययन, विविध खेळ, सहशालेय व अभ्यासपूरक ज्ञानरचनावादी उपक्रम राबविले जात आहेत. तसेच मूल्य शिक्षणावर विशेष भर, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जात आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रशिक्षित उच्च शिक्षित शिक्षक, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह भोजन, उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्ती, संगणक शिक्षण या सुविधांचा लाभ दिला जात आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close