कामाचे आदेश देऊनही पाणि योजनेचे काम नाही! निडी तर्फे अष्टमी जलजीवन योजनेत अडसर कोणाचा ?संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समितीत धडक देत मांडली व्यथा……. 

[avatar]

कामाचे आदेश देऊनही पाणि योजनेचे काम नाही!निडी तर्फे अष्टमी जलजीवन योजनेत अडसर कोणाचा ?संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समितीत धडक देत मांडली व्यथा…….

रोहा(विशेष प्रतिनिधी);- यावर्षी पाऊस कमी झाल्याने अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. रोहा तालुक्यातील निडी तर्फे अष्टमी गावासाठी जलजीवन योजनेच्या माध्यमातून पाणी योजना मंजूर झाली असून घरोघरी नळ कनेक्शन देण्यासाठी ऑक्टो. २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश देखील देण्यात आले आहेत परंतु अद्यापही कामाला सुरुवात झालेली नसल्याने निडी तर्फे अष्टमी गावातील ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या कार्यालयात भेट देऊन आपले गाऱ्हाणे मांडले आहे.

निडी तर्फे अष्टमी गावासाठी पहिल्या टप्प्यात जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून नळपाणी योजना मंजूर झाली असून त्यामध्ये समाविष्ट कामे पूर्ण झाल्याने ग्रामपंचायतीने काम पूर्णत्वाचे दाखले दिले असून बिल देखील संबंधित ठेकेदाराला देण्यात आले आहे. मूळ योजनेत विहीर ,पंप हाऊस व नवीन पंप यांचा समावेश होता. तर योजनेतील उर्वरित कामे करण्यासाठी १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून सन २०२०-२१ मध्ये अंतर्गत नळजोडणी साठी १,९७,००० रुपये ,जुनी पाईपलाईन दुरुस्ती साठी सन २०२१-२२ मध्ये १,२०,००० रुपये ,तर पाणी साठवण टाकी दुरुस्तीसाठी सन २०२२-२३ मध्ये ९० हजार व जुन्या पंपाच्या दुरुस्तीसाठी ४० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सदर कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी ग्रामस्थांनी स्वतः पाठपुरावा करून कामाची अंदाजपत्रके ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन दिली तरी देखील ग्रामपंचायत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात धडक देत आपली व्यथा मांडली आहे.

याबाबत सरपंच अक्षरा डोलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मूळ ठेकेदाराने ५१ जोडण्या दिल्या नसल्याचे सांगितले. तसेच मी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुम्हाला माहिती देते असे सांगितले. या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिद यांच्याशी संपर्क साधला असता मी नुकताच या ग्रामपंचायतीचा कार्यभार स्वीकारला असून माहिती घेऊन सांगतो असे सांगितले आहे. याबाबत पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून माहिती घेतली असता ग्रामस्थांच्या मागणी मध्ये तथ्य असल्याचे दिसून येत आहे. यामुळे निडी तर्फे अष्टमी गावातील ग्रामस्थांना हर घर जल देण्यात अडसर नक्की कोणाचा आहे याचा संबंधित अधिकारी वर्गाने शोध घेऊन लवकरच घरोघरी नळजोडणी द्यावी अशी मागणी होत आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close