वारंवार खंडित होणा-या विद्युत पुरवठ्यामुळे श्रीगणेश मुर्तीकार हैराण : मुरुड तालुका श्रीगणेश मुर्तीकार संघातर्फे महावितरण ला निवेदन…..
वारंवार खंडित होणा-या विद्युत पुरवठ्यामुळे श्रीगणेश मुर्तीकार हैराण : मुरुड तालुका श्रीगणेश मुर्तीकार संघातर्फे महावितरण ला निवेदन…..
कोर्लई(राजीव नेवासेकर)श्रीगणेशोत्सव अवघ्या सव्वा महिन्यावर असून मुरुड मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होणा-या विद्युत पुरवठ्यामुळे श्रीगणेश मुर्तीकारांच्या व्यवसायावर परिणाम होत असून सुरळीत व पुर्ववत वीज पुरवठा करण्यात यावा. याबाबतचे एक निवेदन मुरुड तालुका श्रीगणेश मुर्तीकार संघातर्फे अध्यक्ष श्रीकांत रमाकांत सुर्वे, सचिव संदीप मोकल, सदस्य महेश साळुंखे, अच्युत चव्हाण यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,
येत्या काही दिवसांमध्ये गणपती सण साजरा होणार आहे. तत्पूर्वी सर्व गणेश भक्तांच्या गणेशमुर्तीचे कामकाज आम्ही सर्व मुर्तीकार रात्रंदिवस मेहनत घेवून जोराने करीत असतो व आज देखील करीत आहोत. कारण प्रत्येक गणेशभक्तांना त्यांच्या आवडीनुसार गणेशमुर्तीचे काम करुन देणे हे आमचे कर्तव्य आहे. तसेच या गणेशभक्तांमुळेच आमचा व्यवसाय हा वर्षामधुन एकदाच होत असतो व या व्यवसायावर आमच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह होत आहे. या व्यवसायाव्यतिरीक्त आमच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही। त्यामुळे वर्षातुन एकवेळ आम्हांला गणेशमुर्तीचे काम करुन उत्पन्न प्राप्त करावे लागते व या आमच्या कलाकृतीमधुन आम्हीं गणेशमुर्तीना घडवीत असतो. आम्हांला गणेशमुर्तीचे काम करताना विद्युत पुरवठ्याची अत्यंत आवश्यकता असते. कारण विद्युत पुरवठ्याद्वारे आम्हीं गणेशमुर्तीना रंगकाम करणे वगैरे कामे आम्हीं करीत असतो.
मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या कार्यालयाकडून वारंवार वीज पुरवठा खंडीत केला आत आहे. या खंडीत करण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आम्हांला हातावर हात घेवून कारखान्यामध्ये बसून रहावे लागत आहे. याचा खुप त्रास आम्हांला सहन कराया लागत आहे. कारण आता दिवस कमी राहिलेले असून वेळेमध्ये गणेशमूर्तीचे काम योग्य प्रकारे पूर्ण न झाल्यास आमच्याकडे आलेल्या गणेशभक्तांना आम्ही नाराज करणार आहोत आणि याला सर्वस्वी अबाबदार आपल्या कार्यालयाकडू खंडीत होणारा वीज पुरवठा, कारण सध्या पावसाळा जोरदार सुरु असून गणेशमुर्तीचे मातीकाम सुकविण्यासाठी आम्हांला हिटरचा वगैरे वापर करावा लागतो आणि त्यानंतर रंगकाम करण्यासाठी कॉम्प्रेसरचा वापर करावा लागतो. मात्र आपल्या कार्यालयाकडून सध्या वारंवार वीज पुरवठा बंद केला जात आहे.
तरी आमची आपणास विनंती आहे की, आमच्या अर्जाचा विचार करून आपल्या कार्यालयामार्फत वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा हा नियमीत सुरु करण्यात यावा व यापुढे अत्यंत आवश्यकता असेल तरच वीज पुरवठा खंडीत करावा अन्यथा वीज पुरवठा खंडीत करण्यात येवू नये. जेणेकरून आमच्या व्यवसायावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.असे मुरुड तालुका श्रीगणेश मुर्तीकार संघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.