उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिलासा सिटीस्कॅन, डायलिसिस, रक्तपेढी आदी सेवा सुरू……. 

[avatar]

उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिलासा सिटीस्कॅन, डायलिसिस, रक्तपेढी आदी सेवा सुरू…….

माणगाव(महेश शेलार) माणगाव येथील बहूचर्चित उपजिल्हा रुग्णालयात विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा आणि सेवा कार्यान्वित झाल्या असून काही प्रमाणात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची भरती पुरेशी झाल्याने रुग्ण, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या सुविधा उपलब्ध करण्यासाठी साधारणपणे पाच वर्षांपुर्वी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर मागण्या मान्य न झाल्याने उपोषणे केली होती. याची दखल सरकारने घेऊन संबंधित आरोग्य सेवा उपलब्ध केल्याने रुग्ण आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून समाधान व्यक्त केले जात आहे. हे उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांच्या मान्यतेचे असून मुंबई – गोवा महामार्गावर माणगाव येथे आहे. या रुग्णालयात दररोज ३०० ते ४०० रुग्ण आरोग्य तपासणीसाठी येत असतात. मात्र वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सुविधा नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत होते. त्यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्यात अधिक रक्कम मोजून तपासणी आणि शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागत असत. आता मात्र पुरेशा सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे अशी माहिती सहायक अधिक्षक अविनाश साळवी यांनी दिली.

सदर रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दाखल झालेल्या रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळत आहे. तर खासगी रुग्णांना माफक दरात सिटीस्कॅन मशीनने तपासणी करून मिळत आहे. ही यंत्रणा एका कंपनीला देण्यात आल्याने रुग्णांना दिलासा मिळत आहे. हे सिटीस्कॅन मशीन सेंटर गेली पाच वर्षे धुळखात पडली होती. सरकारी सिटीस्कॅन मशीन कायमस्वरूपी बंद पडलेली होती. त्यामुळे रुग्णांना या मशीनचा लाभ मिळत नव्हता. आता लाभ होऊन रुग्णांच्या पैशांची बचत होत आहे. आता या रुग्णालयात रुग्णांना अत्यंत आवश्यक असलेल्या डायलिसिस सेंटर सुरू झालेले असून चार खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी पुरेसा कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. सध्या किडनी रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळत आहे.

या रुग्णालयात नव्याने रक्तपेढी सुरू करण्यात आली असून त्यामध्ये चार उच्च दाबाचे फ्रीज रक्त पिशव्या साठविण्याची क्षमता आणि व्यवस्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे आता गरजू रुग्णांना कोणत्याही परिस्थितीत तातडीने खासगी रक्त संकलन रक्त प्रयोगशाळेत जावे लागणार नाही. येथे रक्त पिशव्या मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचवले जात आहेत. यापुर्वी गरजवंत रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी महाड, अलिबाग आणि माणगाव येथे धावाधाव आणि पळापळ करावी लागत असे. आता मात्र धावपळ न करता, वेळ व पैसा वाया न घालवता तातडीने रक्त मोफत याच रुग्णालयात सहज उपलब्ध होत आहे. याचबरोबर या उप रुग्णालयात जल शुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून त्याला वॉटर प्युरी फायर अशी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शुद्ध आणि स्वच्छ पाणी रुग्णांना मिळणार आहे. यापुर्वी पिण्याचे शुद्ध पाणी बाजारातून विकत घेऊन रुग्णांना दिले जात होते. आता या सुविधा उपलब्ध झाल्याने पैशांची बचत होत आहे.

कोरोना महामारी काळात मोठ्या क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आला होता. त्याचा लाभ रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जवळच्या तालुक्यातील रुग्णांना होत आहे. ही सुविधा वरदानच ठरली आहे. अतिदक्षता विभागात उपचार करण्यासाठी याचा उपयोग होत असून अनेकांचे श्वास मोकळे होत असून त्यांना पुन्हा जीवन मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली जन आरोग्य योजना येथे सुरू असून किमान पाच लाखांपर्यंत रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध केल्याने आतापर्यंत हजारो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे लाखो रुपयांची बचत झाली आहे. येथे काही महत्त्वाच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. लवकरच आवश्यक असलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी भरती केले जाणार आहेत. त्यामुळे या सर्व आरोग्य सेवांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सहाय्यक अधीक्षक अविनाश साळवी यांनी केले आहे. या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, उदय सामंत, आमदार भरत शेठ गोगावले आदींनी परिश्रम घेतले आहेत.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close